सिद्धनेर्ली : भाजप नेते किरीट सोमय्या यांना मी माहिती पुरविली म्हणताहेत. पण त्यांची कारकीर्दच भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे. एक वेळ त्यांना किरीट सोमय्या परवडतील; पण समरजितसिंह घाटगे नको, अशी म्हणायची वेळ येईल. आता कागलमधील त्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात यापुढची माझी लढाई असेल, असा थेट इशारा शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिला.
एकोंडी (ता. कागल) येथे विविध विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मंडलिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरेंद्र मंडलिक होते.
या वेळी घाटगे म्हणाले की, कागलचे मंत्री स्वतःला वडाचे झाड म्हणताहेत. मात्र ते वडाचे झाड नाहीत. वडाचे झाड तर दिवंगत राजे विक्रमसिंह घाटगे, दिवंगत सदाशिवराव मंडलिक व दिवंगत बाबासाहेब कुपेकर ही मंडळी होती. या झाडांना विळखा घालून त्यांच्या आधाराने मोठे झालेले मंत्री हे जातीयवादी विषारी वेल आहेत. ती कापण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.
या वेळी वीरेंद्र मंडलिक म्हणाले की, गोकुळमध्ये विश्वासघाताने झालेला माझा पराभव ही आमच्या गटाची भळभळती जखम आहे. राजे समरजितसिंह घाटगे व आमची चांगली मैत्री आहे. एकत्र येण्याच्या दृष्टीने आमची काही बिनसलेले नाही. त्याची मुहूर्तमेढ आज रोवली आहे.
