विधानसभेचं अध्यक्षपद जिंकत शिंदे-भाजपा सरकारने मोठा विजय मिळवला आहे. आता त्यांची दुसरी कसोटी आज विधानसभेत लागणार आहे. शिंदे सरकार विश्वासदर्शक ठराव मांडणार आहे. त्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा समोरासमोर येणार आहे. हा विश्वासदर्शक ठराव आम्ही बहुमताने जिंकू असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघांनीही व्यक्त केला आहे. त्यामुळे आजच्या दिवसात शिंदे सरकार ही कसोटी कशी पार करणार की या सगळ्या घडामोडींना आणखी रंजक वळणं मिळणार? हे पाहण्यासारखं असेल.
शिंदे गटाकडून ठाकरे गटातल्या १६ आमदारांच्या निलंबनाची याचिका
शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी ठाकरे गटाच्या १६ आमदारांच्या निलंबनासाठी विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल केली आहे. या १६ आमदारांना नोटिस देण्यात येणार आहे.
शिवसेना विधिमंडळ कार्यालयाचं सील काढलं!
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेच्या विधिमंडळ कार्यालय सील करण्यात आलं होतं. मात्र आता हे सील काढण्यात आलं आहे. मात्र आता त्या ठिकाणी ओळखपत्राशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नाहीये.
