साप्ताहिक श्रमिक समाचार लाईव्ह : जोतीबा डोंगराकडे जाणारा मुख्य रस्ता खचला

 


कोल्हापूर प्रतिनीधी : श्री क्षेत्र जोतिबा डोंगरच्या मुख्य रस्त्यावरील पाण्याचा टाका भागातील रस्ता पावसामुळे खचण्यास सुरुवात झाली आहे. खबरदारी म्हणून दोन दिवसांपासून रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. सध्या डोंगराकडे जाणारी सर्व वाहतूक गायमुख तलावमार्गे सुरू आहे. पाण्याचा टाका या भागात चार-पाच वर्षांपासून रस्ता तुटून जातो. यंदाही हा रस्ता खचण्याचा धोका आहे.

संभाव्य धोका ओळखून सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता वाहतुकीस बंद केला आहे. वाहने जाऊ नयेत म्हणून मुरमाची चर मारून रस्ता बंद केला आहे. जोतिबा डोंगरावर सतत पावसाची रिपरिप असते. तसेच पाण्यात टाका भागात पाणी साचत असल्याने दलदल होते. परिणामी, रस्ता तुटून जातो. या ठिकाणी सलग तीन वर्षे झाले रस्ता तुटून जात आहे. त्यामुळे रस्त्याची तज्ज्ञांमार्फत पाहणी करणे गरजेचे आहे.

सध्या गायमुखमार्गे वाहतूक सुरू असून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मुरमामुळे काही ठिकाणी तर चिखलाचे साम्राज्य आहे. चिखलामुळे दुचाकी घसरून अपघात घडतात. त्यामुळे कायमस्वरूपी मुख्य रस्ता करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच उपाय योजना करणे गरजेचे आहे.