साप्ताहिक श्रमिक समाचार लाईव्ह: माडखोलकर महाविद्यालयात ट्रॅडिशनल डे

 


चंदगड, ता. ३० : महाविद्यालयीन जीवन हा एक सुवर्णकाळ असतो. याच काळात साजरे होणारे महाविद्यालयातील विविध उपक्रम विद्यार्थ्यांच्या जडण-घडणीला चालना देतात. त्यापैकीच एक ट्रॅडिशनल डे हा असतो. खरं तर बदलत्या गतिमान युगात बऱ्याच परंपरागत व सांस्कृतिक पद्धती आपण विसरत चाललो आहोत. त्यांच्या जपणूकीतच खऱ्या अर्थाने सांस्कृतिक वारसा अबाधित राखू शकतो, असे प्रतिपादन दौलत या लघुपटाचे कलाकार आत्माराम पाटील यांनी मांडले.

र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील वाणिज्य विद्याशाखेतर्फे आयोजित पारंपरिक दिवस कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील होते. विद्यार्थी-विद्यार्थीनीना फेटे बांधणे, टाय  बांधणे, साडी नेसण्यापासून ते परंपरागत मेकअप कसा करावा याचे कौशल्य अवगत होते. लावणी, पोवाडे, बडबड गीत, दांडपट्टा, लाठी-काठी वगैरे दोन डझन पेक्षाही अधिक विद्यार्थ्यांनी पारंपारिक कलाविष्कार सादर केला. प्रा. एस के सावंत, प्रा. पी. सी. देशपांडे आदी उपस्थित होते.