साप्ताहिक श्रमिक समाचार लाईव्ह : लालपरीची धाव व्हावी अधिक वेगवान


 

कोल्हापूर : दुर्गम वाडीवस्तीपर्यंत प्रवाशाला सुखरूप सोडणारी आपुलकीची एसटी, शाळकरी मुले-मुली, वयोवृद्ध, महिलांना गावापर्यंत सुरक्षित पोहचवणारी विश्वासाची एसटी, एखादी वस्तू एसटी बसमध्येच विसरली, ती चालक-वाहकाच्या हाती लागल्यास वस्तू प्रवाशांना नक्की परत देणारी प्रामाणिक एसटी, बारशापासून सामुदायिक सहलींपर्यंतचा जगण्याचा प्रत्येक प्रवास सुखकर सुरक्षित घडविणारी एसटी, अशा विविध लौकिकाने भरलेल्या एसटी महामंडळाच्या सेवेला बुधवारी (ता. १) ७५ वर्षे होत आहेत. मात्र, तीन वर्षांत विविध संकटात अडकलेल्या एसटीला दीड हजार कोटींचा तोटा झाला. तो भरून काढण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी एकीचे बळ एकवटण्याचे आव्हान आहे.

राज्यात दररोज १८ हजार गाड्यांतून ३६ लाख प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या एसटीची सेवा राज्याच्या अर्थकरणाला गती देते. या सेवेची पहिली बस १ जून १९४८ ला पुणे-अहमदनगर मार्गावर धावली. तो दिवस एसटीचा वर्धापन दिन म्हणून साजरा होतो. बेडफोर्ड बस गाडीतून सुरू झालेला एसटीचा प्रवास आज साधी बस, जलद बस, परिवर्तन बस, निमआराम बस, एशियाड बस, स्लिपर, शिवनेरी बस, शिवशाही बस, विठाई बसपासून ते शिवाई इलेक्ट्रिक बसपर्यंत आला आहे.

१० वर्षांत खासगी वाहतुकीची स्पर्धा, चारचाकी गाड्यांचे वाढते प्रमाण, एसटीचा प्रवासी वर्ग कमी झाला. कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षे एसटी प्रवास बंद राहिला. कोरोनानंतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन पाच महिने चालले.

१० वर्षांपूर्वी एसटीला १२०० कोटींचा तोटा होता. कोरोना काळात ७०० कोटी, तर संपकाळात ६०० कोटींचे उत्पन्न बुडाले. कर्मचाऱ्यांचे पगार भागवणे मुश्कील झाले. याच काळात एसटीचा हक्काचा प्रवासीही दुरावला. एसटीत सध्या संपात सहभागी न होता कामावर आलेले कर्मचारी, निलंबित झालेले कर्मचारी, संपावर ठाम असलेले कर्मचारी, बडतर्फ कर्मचारी असे विविध गट पडले आहेत. हे गट एकत्र करणे त्या सर्वांत एकसंघ भावना निर्माण करणे, सक्षम प्रवासी सेवेचे नियोजन करणे, विविध योजनांना ऊर्जितावस्था देणे, पर्यटनपूरक सेवांची जोड देणे. अशा उपाययोजनांसाठी प्रयत्न झाले, तरच एसटीचा प्रवास अधिक सुखावह होणार आहे.

एसटी महामंडळाच्या सेवेला नैतिकतेचे बळ आहे. त्या बळावरच एसटीचा गमावलेला प्रवासी एसटीलाच मिळावा, यासाठी कर्मचारी एकसंघ भावनेने काम करतील. त्यासाठी वरिष्ठ ही कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करतील, अशी अपेक्षा आहे.