साप्ताहिक श्रमिक समाचार लाईव्ह : घोडेश्वर परिसराची साफसफाई

 


मुरगूड : कागल तालुक्यातील कुरुकली येथील ''ब'' वर्ग तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळ असलेल्या घोडेश्वर मंदिर परिसरात यात्रेनंतर सर्वत्र अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य पसरले होते. याबाबतचे सचित्र वृत्त ‘सकाळ’मध्ये सोमवारी अंकातून प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाला खडबडून जाग आली आणि प्रशासनाने स्वच्छतेचे काम हाती घेतले.

महाराष्ट्र,कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कुरुकलीतील घोडेश्वर देवालयाची यात्रा झाली. यात्रेनंतर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग, प्लास्टिक पिशव्या, बाटल्यांनी परिसर विद्रूप झाला होता. मंदिर परिसरात खाद्य, खेळण्यांची दुकाने, नारळ विक्रेते व अन्य १२५ पेक्षा अधिक दुकाने दाखल झाली होती. ग्रामपंचायत व यात्रा कमिटीने प्रत्येक दुकानदाराकडून दीड हजारांचा यात्राकर वसूल केला. पण यात्रा होऊन आठवडा उलटल्यानंतरही मजुरांची कमतरता व पाऊस अशी कारणे पुढे करुन स्वच्छता केलेली नव्हती. सोमवारी ‘घोडेश्वर परिसर अस्वच्छ’

मथळ्याखाली सचित्र लेखन झाल्यानंतर ग्रामपंचायतीने स्वच्छता कर्मचाऱ्यासह चार मजूर घेवून स्वच्छता केली. दरम्यान पिराचीवाडी (ता. कागल) शिवशंभू मर्दानी आखाडा मंडळ व स्वराज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, बिद्री संस्थेचे कार्यकर्ते विनामोबदला घोडेश्वर परिसराची स्वच्छता करण्याबाबत इच्छुक होते.