कागल, ता. ११ : कागल नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात ३१ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेत. यातील १० कॅमेरे बंद पडले होते. दिवाळी आणि श्री गहिनीनाथ उरुसाच्या निमित्ताने बंद पडलेले कॅमेरे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातून कॅमेऱ्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. उद्या (ता. १३) पर्यंत सर्वच कॅमेरे सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
शहरातील बाजारपेठ, चौक आणि प्रमुख चौकातील हालचालीवर लक्ष ठेवणे काम पोलिस विभागानंतर सीसीटीव्ही कॅमेरे करत आले आहेत. एखाद्या घटनेतील तपास कामात या कॅमेऱ्याचा चांगला उपयोग होऊ लागला आहे. त्यामुळे महत्वाच्या शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून पोलिस दलावरील ताण कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
कागल शहरही याला अपवाद राहिलेले नाही. कागल नगरपालिकेने शहर आणि उपनरातील महत्वाच्या ३१ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. याला आता तीन वर्षांचा कालावधी झाला आहे. त्यामुळे तांत्रिक बिघाडावरून यातील १० कॅमेरे बंद पडले होते. शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांना आळा घालण्याचे आव्हान पोलिसासमोर आहे. यातच आता दिवाळी आणि श्री गहिनीनाथ उरूसामुळे बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तातडीने दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. बंद पडलेले १० कॅमेरे सुरू केले जाणार आहेत. त्याचप्रमाणे महामार्गाच्या सेवा रस्त्यालगत बसविण्यात आलेले सहा कॅमेरे अन्यत्र हलविण्यात येत आहे.